वाकड, सांगवी येथे विविध विकासकामांना सुरवात खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रस्ता आणि ओपन जिमचे भूमिपूजन संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कस्पटे वस्ती वाकड येथे सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच ममतानगर सांगवी येथे ओपन जिमचे भूमिपूजन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे आभार मानले.
वाकड मधील कस्पटे वस्ती परिसरातील अनमोल रेसिडेन्सी सोसायटी परिसरात चांगला रस्ता नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी खासदार बारणे यांच्याकडे पाठपुरावा करून या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न केले. इथल्या रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली होती. सोसायटीच्या सभासदांना रोज रहदारीसाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. याची तातडीने दखल घेऊन लगेच या रस्त्याच्या कामासाठी खासदार बारणे यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम लवकरच पूर्ण होऊन सोसायटीच्या सभासदांना उत्तम रस्ता उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक संदीप अण्णा कस्पटे, सोसायटीचे चेअरमन मंगेश काकडे, ज्योती पाटील, अनिल दातार आणि सोसायटीतचे सर्व सभासद उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरात नगरविकास विभाग आणि एकूणच विविध विभागांच्या माध्यमातून मोठा निधी आणणे शक्य झाले आहे. खासदार निधी देखील मोठ्या प्रमाणात शहरातील विविध विकासकामांसाठी वापरण्यात आला आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना, ड्रेनेजच्या कामासाठी अमृत योजनेंतर्गत तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत निधी आणला आहे. कस्पटे वस्ती येथे चांगला रस्ता व्हावा ही नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास जात आहे.”
सांगवी मधील नागरिकांना व्यायामासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध
सांगवी मधील ममतानगर परिसरात खासदार निधीतून ओपन जीमचे भूमिपूजन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. या ओपन जिमसाठी 30 लाखांचा निधी उपयोगी येणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, स्वरूपा खापेकर, विजय साने, चेतन शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव, शितल शितोळे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
“या ओपन जीममुळे परिसरातील तरुणांना आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना उत्तम आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देत खासदार श्रीरंग बारणे यांनी ओपन जिमचा नागरिकांनी पुरेपूर उपयोग करावा असे आवाहन केले. खासदार निधी, महापालिका आदींच्या माध्यमातून सांगवीकरांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचेही खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.