पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्याला मोठी पार्श्वभूमी आहे. महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची सुरुवात इथे झाली. स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवणारे लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती गोपालकृष्ण गोखले, रामशास्त्री प्रभुणे, न्यायमूर्ती वाय वी चंद्रचूड, डी वाय चंद्रचूड यांचा सहवास लाभलेली ही भूमी आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी मोशी येथे व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीचा मोशी येथील पेठ क्रमांक 14 मध्ये भूमिपूजन झाले. यावेळी न्यायाधीश भूषण गवई बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक, न्यायाधीश प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, न्यायाधीश तथा पुणे पालक न्यायाधीश रेवती डेरे, न्यायाधीश संदीप मारणे, न्यायाधीश आरिफ डॉक्टर, पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, पिंपरीचे न्यायाधीश राजेश वानखेडे, पिंपरी-चिंचवड अॅड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड रामराजे भोसले पाटील, आमदार महेश लांडगे, यासह प्रशासकीय, पोलीस, विधी विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
न्यायाधीश भूषण गवई म्हणाले, न्यायाचा हक्क हा मुलभूत हक्क म्हणून मान्य करण्यात आला आहे. न्यायव्यवस्थेचा गाभा हा तालुका आणि जिल्हा न्यायालये आहेत. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचा निर्भीडपणा, निष्पक्षपणा न्यायाधीशांनी पाळला पाहिजे, असे आवाहन देखील न्यायमूर्ती गवई यांनी केले.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. त्यामुळे इथे औद्योगिक न्यायालय होणे गरजेचे आहे. ते आता ही इमारत झाल्यावर होणार आहे. आपल्याकडे विवाह विषयक वादांचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यासाठी देखील स्वतंत्र न्यायालय होईल. दिवाणी, फौजदारी, सत्र आणि जिल्हा न्यायालये ही खरी न्यायालये आहेत. ती सुदृढ करण्यासाठी आपण जोर दिला पाहिजे. या न्यायालयांना योग्य ती साधने मिळाली पाहिजेत. नगर, बीड, कोल्हापूर येथील न्यायालयांच्या माध्यमातून आधुनिक न्यायालये उभारण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसते. मोशी येथे होणारी इमारत देखील अत्याधुनिक असेल असे न्यायमूर्ती अभय ओक यांनी मत व्यक्त केले.
न्यायमूर्ती प्रसन्न वराळे म्हणाले की, प्रस्तावित इमारत चांगल्या दर्जाची होईल. विधिज्ञ, पक्षकार, दिव्यांग, महिला आणि बालक यांचा वावर, प्रवेश आणि बसण्यासाठी योग्य सोय या इमारतीत होणार आहे. ही इमारत सर्व सुविधांनी उपयुक्त असेल मात्र न्यायासाठी ती अचेतन असेल. या इमारतीत न्यायाचे चैतन्य नांदेल.
पिंपरी येथील न्यायालयाची इमारत 24 महिन्यांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे न्यायव्यवस्थेसाठी चांगले वातावरण निर्माण होणार आहे, न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय म्हणाले.
न्यायमूर्ती रेवती डेरे म्हणाल्या की, वकील हा न्यायदानातील महत्वाचा घटक आहे. न्यायदानातील विलंब हा न्याय नाकारण्यासारखा असतो. हे होऊ नये म्हणून आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे. केस निकाली काढण्यामध्ये वकिलांचा मोठा वाटा असतो. पिंपरी न्यायालयात आता 9 कोर्ट आहेत. या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर 28 कोर्ट तयार होणार आहेत. त्यातच पोक्सो कोर्ट देखील समाविष्ट असल्याचे सांगत त्यांनी नवीन इमारतीच्या पायाभरणीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन इमारत मोशी येथे प्रस्तावित आहे. इथे अत्याधुनिक विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. 65 हजार चौरस मीटर जागा न्यायालयासाठी उपलब्ध झाली आहे. त्यातील 28 हजार चौरस मीटर क्षेत्रात ही इमारत होणार आहे. 28 कोर्ट हॉल होणार आहेत. पोक्सो कोर्टासाठी वेगळी व्यवस्था देखील केली जाणार आहे .अनेक वर्षांचा पाठपुरावा यशस्वी ठरला असे मत न्यायाधीश महेंद्र महाजन व्यक्त केले.