महानगरपालिकेच्या वतीने आयोजित रानजाई महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी दिली भेट
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आम्ही भारताचे सुजाण नागरिक शपथ घेतो की, आम्ही या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला या पर्यावरणाला आमच्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊ. आम्ही या देशाला सुजलाम- सुफलाम करण्यासाठी कटीबध्द राहू व आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही, जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू” अशी वसुंधरा शपथ रानजाई महोत्सवात घेण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने रानजाई महोत्सव’ व २७ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन नियोजित महापौर निवास निगडी, प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवात नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद भेटत आहे.
या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सायंकाळच्या सत्रात विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिशय अभिनव असा रानजाई महोत्सव हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असतो. या उपक्रमामुळे नागरिकांच्या मनात पर्यावरण विषयीचे महत्व, आपुलकी वाढत आहे. या महोत्सवामुळे आपले शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी तसेच शहरात ठिकठिकाणी झाडे लावण्यासाठी नागरिकांना निश्चितच प्रोत्साहान देखील मिळेल. तसेच नागरिकांनीही आपले शहर स्वच्छ तसेच पर्यावरणपुरक ठेवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेप्रती जनजागृती करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
दरम्यान, महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी उद्याने व शिल्पकला प्रात्याक्षिके दाखवली तसेच यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. यानंतर ख्यातनाम गायक उदय रामदास यांचा मंत्रमुग्ध करणारा नादब्रम्ह “संगीत संध्या” हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय घोळवे यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक आणि रमेश भोसले यांनी केले.