ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरीसांस्कृतिक

“मराठी गझलेत सुरेश भट हे मोठे नाव!” – म. भा. चव्हाण

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – “मराठी गझलेत सुरेश भट हे मोठे नाव आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला ही भाग्याची गोष्ट आहे!” अशी कृतज्ञतापर भावना ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

 

शब्दधन काव्यमंचाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते म. भा. चव्हाण यांना गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले; तसेच सुहास घुमरे, अनिल नाटेकर, नीलेश शेंबेकर आणि वैशाली माळी यांना गझलसम्राट सुरेश भट युवा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ गझलकार रघुनाथ पाटील अध्यक्षस्थानी होते; तसेच डॉ. प्रशांत पाटोळे आणि नंदकुमार मुरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले की, “संत तुकोबांच्या साहित्यातील विद्रोही भावाशी म. भा. चव्हाण यांच्या कवितेची नाळ जोडली आहे!” रघुनाथ पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “गझल ही काव्यविधा आयुष्य मागते. त्यामुळे हयात घालविल्याशिवाय गझल साध्य होत नाही. आपली गझल रसिकाभिमुख होण्यासाठी ती कवींनी स्वतः समजून घेणे आवश्यक असते!” असे विचार व्यक्त केले.

पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक बशीर मुजावर, पुरुषोत्तम सदाफुले, ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, शोभा जोशी, राधाबाई वाघमारे, प्रदीप तळेकर, आत्माराम हारे, राजेंद्र घावटे, राजेंद्र पगारे, सुलभा सत्तुरवार, कैलास भैरट, जयवंत पवार, सविता इंगळे, कांचन नेवे, राजेंद्र भागवत, भाग्येश अवधानी, वंदना पगारे, संदीप जाधव, बाळकृष्ण अमृतकर, जय जगताप, डॉ. मंदार खरे, अमरजित गायकवाड, डॉ. अभय तांबिरे यांनी सहभाग घेतला.

पुरस्कार सोहळ्यानंतर सर्व पुरस्कारार्थींनी आणि विजय वडवेराव यांनी गझल मुशायऱ्यात गझलांचे प्रभावी सादरीकरण केले.

शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले. ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, प्रशांत माळी, हेमंत जोशी, जयश्री श्रीखंडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. फुलवती जगताप यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button