

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षात गेली अनेक वर्षे निष्ठेने काम करूनही योग्य वेळी संधी न मिळाल्याने एका निष्ठावंत कार्यकर्त्याने पक्षातील नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणतेही पद नसताना प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. मात्र, निवडणुकीच्या वेळी डावलण्यात आल्याची खंत व्यक्त करत संबंधित कार्यकर्त्याने पक्षश्रेष्ठींसमोर अनेक बोचरे प्रश्न उपस्थित केले आहेत.
गरीब कुटुंबातून राजकारणात आलेल्या व्यक्तीचा उद्देश केवळ पद मिळवणे नसून समाजसेवा आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे हा असतो, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करताना नागरिकांचा विश्वास संपादन केला. प्रभागातील नागरिकांचा निवडणूक लढवण्याचा आग्रह असतानाही केवळ पक्षनिष्ठा आणि नेतृत्वाने दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून निवडणुकीतून माघार घेतल्याचे नाराज कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक आमदार आणि त्यांच्या बंधूंनी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या साक्षीने तसेच ग्रामस्थांसमोर अस्मिताताईंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, आगामी काळात निश्चित संधी दिली जाईल, असा शब्द दिला होता. त्या शब्दावर विश्वास ठेवून पक्षाचा निर्णय मान्य केला. मात्र, प्रत्यक्ष संधी देण्याची वेळ आली तेव्हा दिलेला शब्द पाळला गेला नाही, अशी खंत नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
“कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त झेंडे उचलायचे, सतरंज्या टाकायच्या आणि नेत्यांच्या मागे फिरायचे का? पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आली की त्यांना डावलायचे, ही कुठली कार्यपद्धती?” असा थेट सवाल कार्यकर्त्यानी उपस्थित केला आहे.
पक्षातील पदांचे वाटप, नियुक्त्या आणि उमेदवारी देताना निष्ठा, प्रामाणिकपणा व समाजकार्यापेक्षा वशिलेबाजी आणि पैशांच्या ताकदीला महत्त्व दिले जात आहे का, याची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
ही नाराजी केवळ एखाद्या पदासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले आहे.
“कार्यकर्ता हा केवळ निवडणुकीपुरता वापरण्याचा माणूस नसतो, तोच पक्षाचा खरा पाया असतो. पाया मजबूत असेल तरच पक्षाची इमारत भक्कम उभी राहते,” अशा शब्दांत नाराज कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
आता या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या नाराजीची भाजपचे वरिष्ठ नेतृत्व कितपत दखल घेते आणि दिलेल्या शब्दाबाबत काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



















