
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेचे उपशहरप्रमुख निखिल ढळवी यांच्या वतीने गुरुवारी (दि. १९) विठ्ठलवाडी येथील संत तुकाराम महाराज पालखी तळ येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान, नेत्र तपासणी, बॉडी फॅट चेकअप आणि रक्त तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास इअरबड्स, स्मार्ट वॉच किंवा स्कूल बॅग भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे.
याशिवाय युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी आणि युवक-युवतींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन युवा सेनेचे उपशहरप्रमुख निखिल ढळवी यांनी केले आहे.



















