
दिवंगत गिरीश बापट व अजित पवार यांचे पोस्टर हातात घेऊन लक्ष वेधण्याचा इशारा
टू व्हीलर टॅक्सी बंदी, कल्याणकारी महामंडळ व इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देशपातळीवर दाद मागणार.
राजकीय पुढाकार नसला तरी, प्रशासनाने सहकार्य करून गृहमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घडवून आणावी – राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे लाडके व कार्यक्षम केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री, माननीय अमित शहा हे दिनांक १५ आणि १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील लाखो ऑटो, टॅक्सी व कॅब चालकांच्या प्रलंबित व गंभीर प्रश्नांसंदर्भात गृहमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची भेट घडून आणावी, अशी अधिकृत मागणी ऑटो-टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष तथा कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
चालकांच्या प्रलंबित समस्या आणि आंदोलनाचा लढा:
सध्या पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांच्या वतीने विविध प्रश्नांवर आंदोलने सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील ज्वलंत प्रश्नांचा समावेश आहे:
१. टू व्हीलर टॅक्सी बंदी: पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी टू व्हीलर टॅक्सीवर बंदी घातली असून आरटीओने काही कंपन्यांवर गुन्हे (FIR) दाखल केले आहेत. मात्र, प्रत्यक्षामध्ये या कंपन्यांचा बेकायदेशीर व्यवसाय राजरोसपणे सुरूच असल्याने सर्वसामान्य चालकांची रोजीरोटी धोक्यात आली आहे.
२. कल्याणकारी महामंडळ: चालकांसाठी स्वतंत्र ‘कल्याणकारी महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी.
३. एटीएस सेंटर व सीएनजी सिलिंडर चाचणी: वाहन फिटनेस व सीएनजी सिलिंडर टेस्टिंगमधील जाचक अटी आणि नाहक पिळवणूक थांबवणे.
राज्यस्तरीय बैठक व भेटीची आक्रमक भूमिका:
याच प्रश्नांवर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील ऑटो-टॅक्सी चालकांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी एकत्र येत आहेत.
याबाबत बोलताना डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, “देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा होत ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांची भेट घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुर्दैवाने या प्रश्नांवर आज राजकीय पातळीवर कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. पूर्वी आदरणीय अजितदादा पवार किंवा स्व. गिरीश बापट साहेब अशा प्रश्नांवर तातडीने पुढाकार घेत असत, परंतु सध्या अशी पोकळी जाणवत आहे. म्हणूनच आम्ही जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला पत्र लिहून, आमच्या शिष्टमंडळाची भेट माननीय गृहमंत्र्यांसोबत घडवून आणण्यासाठी कायदेशीर सहकार्य व समन्वय साधण्याची नम्र विनंती केली आहे.”
मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आगळीवेगळी तयारी:
जर प्रशासनाकडून किंवा राजकीय पातळीवर योग्य तो पुढाकार मिळाला नाही, तर केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील ऑटो-टॅक्सी चालक स्व. गिरीश बापट आणि अजित पवार यांचे पोस्टर हातात घेऊन त्यांच्यासमोर शांततापूर्ण मार्गाने आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न करतील, असा इशाराही डॉ. बाबा कांबळे यांनी या वेळी दिला आहे.



















