
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात आगीच्या ७६ घटनांची नोंद; कोणतीही जीवितहानी नाही
आगीवर नियंत्रणासाठी ४२ अग्निशमन वाहनांसह २५० अधिकारी-कर्मचारी तैनात; शहरभर नियमित गस्त
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी आगीच्या एकूण ७६ घटनांची नोंद झाली. यामध्ये २० फ्लॅट, घरे आणि दुकानांना आग लागल्याची, तर ५० ठिकाणी मोकळ्या मैदानातील गवत, कचरा आणि झाडांना आग लागल्याची व फ्लेक्स, कंपाउंड, वाहने आणि टॉवर यांना आग लागण्याच्या ६ घटनांची नोंद करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रत्येक घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सदर घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
विविध भागांतील ७६ आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात यश
सदर घटनांमध्ये शहरातील विविध निवासी आणि व्यावसायिक भागांचा समावेश होता. ज्यामध्ये स्पाईन रोडवरील सेक्टर १२ येथील निवासी इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील फ्लॅट, जाधववाडी, चिखली येथील आठव्या मजल्यावरील फ्लॅट तसेच मोशी येथील मंत्रा मोमेंट सोसायटी परिसरातही आग लागल्याची घटना समोर आली.
तसेच मोरवाडी येथे चारचाकी वाहनाला, तर काळेवाडीतील बारणे कॉर्नर, थेरगाव येथे दोन दुचाकींना आग लागली. याशिवाय भोसरीतील लांडेवाडी, थरमॅक्स चौक-चिखली रोड, पिंपरी चौकातील गोकुळ हॉटेल परिसर, चिंचवड येथील एम्पायर इस्टेट परिसरातील नदीपात्र, मोई-निघोजे रोड, मोशी कब्रस्तान परिसर, निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव तसेच चिंतामणी चौक, चिंचवड चौक आणि चिंचोळे नगर परिसरातही आगीच्या घटना घडल्या.
नेहरूनगर येथील मयूर पॅनोरमा सोसायटी परिसरात गवताला, पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलेनियम सोसायटी परिसरात नारळाच्या झाडाला, तर पिंपळे गुरव येथील भैरवनाथ नगर परिसरात कचऱ्याला आग लागली. या सर्व घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने कार्यवाही करून आगीचा प्रसार रोखला.
अग्निशमन विभागाच्या पूर्वनियोजनामुळे मोठी दुर्घटना टळली
दिवाळीच्या कालावधीत आगीच्या संभाव्य घटना लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने विशेष खबरदारी घेतली होती. शहरातील नियमित १० अग्निशमन केंद्रांव्यतिरिक्त महत्त्वाच्या १२ ठिकाणी अग्निशमन वाहने आणि आवश्यक मनुष्यबळ तैनात ठेवण्यात आले होते. यामुळे आगीची वर्दी मिळताच जवळच्या उपलब्ध पथकाला तातडीने घटनास्थळी पोहोचणे शक्य झाले.
या विशेष नियोजनांतर्गत शहरात एकूण ४२ अग्निशमन वाहने आणि २५० अधिकारी व कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. अग्निशमन विभागाच्या या पूर्वतयारीमुळे तसेच जवानांच्या तत्पर प्रतिसादामुळे आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले आणि संभाव्य मोठ्या दुर्घटना टाळण्यात यश आले.
दरम्यान, नागरिकांनी निवासी इमारती, व्यावसायिक संकुले आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने अग्निशमन विभागाच्या १०१ किंवा ७०३०१०८९९१ (मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
“दिवाळीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. शहरातील १० अग्निशमन केंद्रांसह १२ महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमन वाहने व मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविता आले आणि मोठी दुर्घटना टाळता आली. नागरिकांची सुरक्षितता ही महानगरपालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“दिवाळीच्या कालावधीत आगीच्या घटनांना तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी अग्निशमन विभागाची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ४२ अग्निशमन वाहने आणि २५० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरभर आग नियंत्रणाची कार्यवाही करण्यात आली. जवानांनी समन्वयाने आणि तत्परतेने कार्यवाही केल्यामुळे सर्व घटनांमध्ये जीवितहानी टाळणे शक्य झाले. नागरिकांनीही अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.”
– व्यंकटेश दुर्वास, उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका



















