
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली योगदान प्रतिष्ठानच्या वतीने नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी प्रभागातील नागरिकांसाठी भव्य दिवाळी खरेदी व विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रदर्शनात सुमारे १५० स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. गेल्या आठ वर्षांपासून सुरेश भोईर यांच्याकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश भोईर, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनात आकाशकंदील, पणत्या, दिवाळी फराळ, कपडे, इमिटेशन ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, वडापाव, थालीपीठ, पाणीपुरी, भेळ, केक आदी विविध वस्तूंचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. महिलांनी तयार केलेल्या घरगुती वस्तू व खाद्यपदार्थांना विशेष प्रतिसाद मिळाला. लहान मुलांसाठी खेळणी आणि खाद्यपदार्थांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
गजबजलेल्या शहरात खरेदीसाठी होणारी गर्दी आणि पार्किंगची समस्या टाळून नागरिकांना आपल्या परिसरातच दिवाळी खरेदीची संधी उपलब्ध झाली. स्थानिक महिला उद्योजिका व विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देत ‘लोकल टू व्होकल’ संकल्पनेलाही या उपक्रमातून प्रोत्साहन देण्यात आले.
तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत खरेदीचा आनंद लुटला. स्थानिक विक्रेत्यांना प्रोत्साहन आणि नागरिकांना परिसरातच खरेदीची सुविधा देणारा हा उपक्रम ठरला.



















