
कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघाचा इशारा; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विना परवाना बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करावीत, तसेच संबंधित ॲप बंद करण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघाने केली आहे. पुढील आठ दिवसांत कारवाई न झाल्यास पुणे व पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालय आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला.
कष्टकरी रिक्षा- टॅक्सी चालक संघर्ष महासंघ तर्फे आज थरमॅक्स चौक चिंचवड येथे रिक्षा चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निमंत्रक नाना कसबे, संघटक विशाल सरवदे, सचिन मुरगुंड, बाबासाहेब सरवदे, राजू होनमाने, दादा खांडेकर, राजू बोराडे, किशोर टोणपे, मनोज घोडके आदी उपस्थित होते.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तनिवेदनात रॅपीडो कंपनीकडे वैध बाईक टॅक्सी ॲग्रीगेटर परवाना नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रॅपीडो, उबेर आणि ओला यांसारख्या कंपन्यांच्या बाईक टॅक्सी सुरू असल्याचा आरोप महासंघाने केला. या प्रकारामुळे लाखो रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारावर परिणाम होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे काशिनाथ नखाते यांनी म्हटले आहे.
विना परवाना तसेच विमा आणि नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर सायबर क्राईम द्वारे आणि फौजदारी खटला दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. यासंदर्भात चिंचवड येथे झालेल्या बैठकीत रिक्षाचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा निर्णय घेतला.
“कायद्याचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या उपजीविकेवर गदा येत असताना प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. विना परवाना बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांवर एक दोन नव्हे तर अधिक प्रमाणात गुन्हे दाखल करून वाहने जप्त करावीत आणि बेकायदेशीर सेवा बंद करावी. आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला.



















