
मतदारांनी डॉ स्मिता योगेश जाधव व कौस्तुभ गावडे या भाजपच्या उमेदवारांना मतदान करावे – कामगारनेते यशवंत भोसले यांचे आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदान करून विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भोसले यांनी केले. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेला नंदू आप्पा कदम ,महेंद्र बाविस्कर, मंगेश धाडगे, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, डॉ. स्मिता योगेश जाधव या डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा शिक्षणमहर्षी पी. डी. पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांचे बालपण आणि शिक्षण याच परिसरात झाले असून, गेल्या १७ वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेने पिंपरी-चिंचवड शहरासह देशाच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी देश-विदेशांत विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.डॉ. स्मिता जाधव या आपल्या शहरातीलच कन्या असून, त्यांना पदवीधर मतदारांनी आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. पुणे पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतील मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान करावे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी एम.कॉम. आणि एमबीएपर्यंत शिक्षण घेतले असून, ते शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे नातू आहेत. शिक्षण क्षेत्राशी संबंधित पार्श्वभूमी असलेल्या दोन्ही उमेदवारांना भाजपने संधी दिली असल्याचे सांगत, पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी या उमेदवारांना पाठिंबा द्यावा.मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती ही कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिली.



















