
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सहावा “राष्ट्रीय फार्माकोविजिलन्स सप्ताह” २०२६ विविध शैक्षणिक, सामाजिक व सृजनशील उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या सप्ताहाची थीम “औषध दक्षतेद्वारे औषधांच्या योग्य व विवेकपूर्ण वापरास प्रोत्साहन: सुरक्षित आरोग्यसेवेच्या दिशेने एक पाऊल”अशी होती.
सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी कनेक्टिंग एक्स्टेमपोर, मीम आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, औषधांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती मोहीम व पथनाट्य, आंतर महाविद्यालयीन मेड सेफ्टी फार्मा न्यूज रूम, Rx म्युझिकल डीकोड’, ‘लॉक अँड की एस्केप रूम ’, ‘एड्री फाय – डीकोड द क्लू (ADRify – Decode the clue) यांसह विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाच्या समारोप समारंभास लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या चीफ ऑफ मेडिकल सर्व्हिसेस डॉ. प्रज्ञा बस्ते आणि मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, निगडी येथील प्रा. डॉ. प्रशांत पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे फार्माकोलॉजी विभाग प्रमुख डॉ. आशिष कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रज्ञा बस्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना औषधांच्या प्रतिकूल परिणामांची योग्य नोंद, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक काळजी आणि फार्माकोविजिलन्सच्या क्षेत्रातील फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका यावर विशेष प्रकाश टाकला. औषधोपचार अधिक सुरक्षित व परिणामकारक करण्यासाठी फार्माकोविजिलन्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. प्रशांत पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा उपक्रमांमुळे फार्माकोव्हिजिलन्सबाबतची जागरूकता वाढण्यास आणि ती अधिक बळकट होण्यास मदत होते, असे सांगितले. तसेच, ‘मेड सेफ्टी फार्मा न्यूज रूम’ स्पर्धेचे परीक्षण करताना जणू काही न्यूज चॅनेल ऐकत असल्याचा अनुभव आला, असे मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
समारोप कार्यक्रमात सप्ताहादरम्यान आयोजित विविध स्पर्धांतील विजेते व उपविजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
संकुल संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.
फार्माकोव्हिजिलन्स हा केवळ अभ्यासाचा विषय नसून, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक आरोग्यसेवा व्यावसायिकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. आजच्या सत्रातील प्रमुख पाहुण्या डॉ. प्रज्ञा बस्ते यांचे तज्ज्ञत्व यावर्षीच्या फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाच्या विषयाशी अत्यंत सुसंगत आहे. भविष्यातील आरोग्यसेवा व्यावसायिक म्हणून विद्यार्थ्यांनी औषधांचा सुरक्षित, योग्य आणि विवेकपूर्ण वापर सुनिश्चित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी व्यक्त केले.
फार्म. डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी) च्या विद्यार्थ्यांनी फार्माकोव्हिजिलन्सचे ज्ञान आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये प्रभावीपणे वापरावे आणि रुग्णांच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य द्यावे, असे मत फार्मसी प्रॅक्टिस विभागाचे प्रमुख डॉ. रामदास शिंदे यांनी व्यक्त केले.
या सप्ताहाचे समन्वयक व यशस्वी नियोजन डॉ. निकिता पारगे आणि डॉ. ऋतुजा हिप्परकर यांनी केले. डॉ. संकेत कदम, डॉ. ऐश्वर्या उंचेगावकर आणि डॉ. व्यंकटेश चिंतलवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

















