
श्रीरामपूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्य तथा रयत शैक्षणिक संकुल, श्रीरामपूरच्या प्रमुख मीना जगधने यांच्या प्रदीर्घ, मूल्याधिष्ठित, नाविन्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत ग्रीन वर्ल्ड संस्थेच्या वतीने त्यांना ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, नऱ्हे-आंबेगाव, पुणे येथे झालेल्या समारंभात महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर खिलारे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी डॉ. पराग काळकर म्हणाले, “मीना जगधने यांचे कार्य विद्यार्थी केंद्रित असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देतानाच समाजाचे प्रश्न सोडविण्याची जाणीव निर्माण केली आहे. समाज परिवर्तनाच्या दृष्टीने त्यांचे कार्य आदर्शवत आहे.”
ज्ञानेश्वर खिलारे म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचे कार्य मीना जगधने करीत आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याचा त्यांचा उपक्रम गौरवास्पद आहे.”
कृषी उद्योजक उदय बोरावके यांनी मीना जगधने या मनस्वी शिक्षिका संबोधत, वयाच्या ८५व्या वर्षीही त्यांची कार्यतत्परता प्रेरणादायी असल्याचे सांगितले. रयत शैक्षणिक संकुलाला नवी उंची देण्यात तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
मीना जगधने यांच्या कार्यातून ‘त्याग, सेवा आणि समर्पण’ या मूल्यांना आधुनिक शिक्षणाची जोड मिळाली आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून प्राथमिक विद्यालयापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत संगणक, इंटरनेट, इंटरॅक्टिव्ह पॅनल, भाषा व गणित प्रयोगशाळा, एआय लॅब, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, ई-कंटेंट स्टुडिओ व तारांगण यांसारख्या आधुनिक सुविधा विकसित झाल्या. आठ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यालयात आज १८०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ‘वाचन कट्टा’, तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स व एमबीए यांसारख्या अभ्यासक्रमांच्या विकासातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकी, माणुसकी, साधेपणा आणि नवनिर्मितीची तळमळ ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना मीना जगधने म्हणाल्या “कर्मवीरांचा सहवास पवार कुटुंबीयांना लाभला आहे. त्यामुळेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आम्हा सर्व भावंडांना संधी मिळाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मी धन्यतेची आणि गौरवाची बाब समजते.”
या समारंभास सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख मा. प्रतापराव पवार, रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोरराजे निंबाळकर, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, तसेच रयत संकुलातील प्राचार्य प्रो. डॉ. प्रवीण बडधे, प्राचार्य डॉ. संजय कांबळे, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, मुख्याध्यापक सुनील साळवे, मुख्याध्यापिका सोनाली पैठणे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन वर्ल्डचे आयोजक गौतम कोतवाल यांनी केले, तर आभार रवी चौधरी यांनी मानले. मीना जगधने यांच्या पुरस्काराबद्दल रयत संकुलातील सर्व घटकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले.

















