
महापालिका क्षेत्रात सुमारे १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे संकलन; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद
३३ हजार ८६ पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा समावेश; ६७ हजार ७७९ किलो निर्माल्याचे संकलन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत विविध उपाययोजना करण्यात आल्या. गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन, निर्माल्य संकलन, कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती तसेच शाडू मातीच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे.
गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता पर्यावरणपूरक पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने एकूण ६३ कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले होते. या माध्यमातून सुमारे १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले असून, यामध्ये सुमारे ३८ हजार ८६ पर्यावरणपूरक म्हणजेच शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा समावेश आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपलब्ध आकडेवारीनुसार, अ क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ७८०, ब क्षेत्रीय कार्यालयात २० हजार ५२३, क क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ३७२, ड क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ८०, इ क्षेत्रीय कार्यालयात १५ हजार ४२०, फ क्षेत्रीय कार्यालयात ७ हजार ३०८, ग क्षेत्रीय कार्यालयात १० हजार २८, ह क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ९६, ज क्षेत्रीय कार्यालयात २६ हजार ५२३ आणि ल क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ११६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
*निर्माल्य संकलन व व्यवस्थापनावर विशेष भर*
गणेशोत्सवाच्या कालावधीत निर्माल्याचे योग्य संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने विशेष व्यवस्था केली. उपलब्ध दैनंदिन नोंदीनुसार एकूण ६७ हजार ७७९.४५ किलो म्हणजेच सुमारे ६७.७८ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले आहे.
फुले, हार आणि अन्य निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्याचे योग्य व्यवस्थापन व प्रक्रिया करण्यावर भर देण्यात आला. निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता स्वतंत्रपणे संकलित केल्यामुळे जलप्रदूषण कमी करण्यास मदत झाली.
*पुनरावर्तनातून शाडू मातीच्या पुनर्वापराला चालना*
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने शाडू मातीच्या पुनर्वापरावरही भर देण्यात आला. उपलब्ध नोंदीनुसार १ हजार ७७१ किलो शाडू मातीचे संकलन करण्यात आले आहे. तसेच ११ हजार ४८९ किलो माती पुनर्वापरासाठी स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गणेशमूर्ती विसर्जनानंतर उपलब्ध होणाऱ्या शाडू मातीचा योग्य प्रकारे पुनर्वापर व्हावा, यासाठी नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून मातीचा पुनर्वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापरासोबतच विसर्जनानंतर उपलब्ध होणाऱ्या मातीचे पुनर्चक्रण करण्याच्या संकल्पनेला यामुळे चालना मिळाली.
गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक व शाश्वत पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सुविधा आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. कृत्रिम विसर्जन तलावांच्या सुविधेमुळे नदी, नाले, तलाव आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये थेट मूर्ती विसर्जित होण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर, कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर, निर्माल्याचे स्वतंत्र संकलन आणि शाडू मातीचा पुनर्वापर यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागला.

















