
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीला पसंती दिल्याने पुणे मेट्रोच्या प्रवासीसंख्येने यंदा नवा टप्पा गाठला. १४ ते २५ सप्टेंबर या १२ दिवसांत तब्बल ४८ लाख ३२ हजार ९१५ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. या कालावधीत महामेट्रोला ७ कोटी ४९ लाख २८ हजार ३७७ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रोवर सर्वाधिक ताण राहिला. २५ सप्टेंबर सकाळी ६ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ या २४ तासांत ५ लाख ८० हजार २८० प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. यातून एका दिवसात ८५ लाख ६१ हजार ८९५ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
गेल्या दोन वर्षांत मेट्रोच्या गणेशोत्सवातील प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ झाली आहे. २०२४ मध्ये २० लाख ४५ हजार १०० प्रवाशांनी प्रवास केला होता. २०२५ मध्ये ही संख्या ३७ लाख १७ हजार ५७८ झाली, तर यंदा ती ४८ लाखांवर पोहोचली. गतवर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे.
गणेशोत्सव काळात पीसीएमसी-स्वारगेट मार्गावर २५ लाख १५ हजार ५१६, तर वनाज-रामवाडी मार्गावर २३ लाख १७ हजार ३९९ प्रवाशांची नोंद झाली. दोन्ही मार्गांना जोडणाऱ्या जिल्हा न्यायालय स्थानकावर १० लाख ३९ हजार ४५२ प्रवाशांनी इंटरचेंजचा वापर केला.
महात्मा फुले मंडई स्थानकाने ६ लाख ८२ हजार ४७३ प्रवाशांसह सर्वाधिक गर्दी नोंदवली. त्यानंतर पीसीएमसी, स्वारगेट, रामवाडी आणि पीएमसी स्थानकांचा क्रमांक राहिला.
उत्सवाच्या १२ दिवसांत ७१ टक्के प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीचा, तर ८६ टक्के प्रवाशांन डिजिटल पेमेंटचा वापर केला. विसर्जनाच्या दिवशी ११ स्थानकांवर प्रत्येकी २० हजारांहून अधिक प्रवास आले. वाढती गर्दी लक्षात घेऊन पाच मिनिटांच्या अंतराने मेट्रो, २४ तास सेवा आणि प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.

















