
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३४ वे वर्ष ;
पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… मोरया, मोरया… जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पांची श्री वक्रतुंड रथातून वैभवशाली सांगता मिरवणूक पार पडली. अनंत चतुदर्शी ला रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावरील हौदात मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप देण्यात आला.
सलग चौथ्या वर्षी दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यावेळी लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटात निघाली.
तर, सायंकाळी ७.३० वाजता टिळक चौकात मुख्य विसर्जन रथाचे आगमन होताच हा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रथाचे सारथ्य देखील यावेळी केले.
श्री वक्रतुंड रथाची मांडणी यंदाची प्रतिकृती असलेल्या वृंदावनमधील प्रेम मंदिराच्या विषयाप्रमाणे करण्यात आली होती. मंदिर वास्तुकलेने प्रेरित असा हा रथ तयार करण्यात आला. रथाची संकल्पना भारतीय मंदिर वास्तु केलेवर आधारित असून त्यात पारंपरिक शिल्पकला आणि आधुनिक फॅब्रिकेशनचा सुंदर संगम भाविकांना पाहायला मिळाला.
मिरवणुकीत ‘जय गणेश अमली पदार्थ मुक्त भारत अभियान’ जनजागृती करणारा ‘मानवसेवा रथ’ अग्रभागी होता. त्यामध्ये विनायक आणि रोहन देवळणकर यांचा चौघडा व प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन झाले. तसेच स्वरूपवर्धिनीचे पथक, प्रभात बँड, दरबार बँड आणि केरळचे चेंदा मेलम पथक असा लवाजमा होता. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील मोठया संख्येने सहभागी झाले.
*’दगडूशेठ’ च्या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह प्रक्षेपण*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक जगभरातील गणेशभक्तांना अनुभविता यावी, यासाठी ट्र्स्टतर्फे यावर्षी विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. ट्रस्टच्या युट्युब पेजसह सर्व सोशल माध्यमांवर ही मिरवणूक घरबसल्या पाहण्याचा आनंद जगभरातील लाखो गणेशभक्तांनी घेतला.

















