
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३ चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पहिल्या टप्प्यात २३ पैकी १७ स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू करण्याची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) तयारी आहे. मात्र, पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आणि पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) उद्घाटनाची तारीख अद्याप न मिळाल्याने लोकार्पणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) मार्गिका-३च्या कामाची आणि गुणवत्तेची पाहणी केली. पुण्यातील जिल्हा न्यायालय स्थानकावर महामेट्रोशी जोडणाऱ्या १५० मीटर लांबीच्या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मार्गिका-३वरून जिल्हा न्यायालयात येणाऱ्या प्रवाशांना महामेट्रोच्या अन्य मार्गिकांशी जोडणी मिळणार आहे.
मार्गिका-३ ही २३.२०३ किलोमीटर लांबीची असून त्यावर २३ स्थानके आहेत. केंद्र सरकारच्या नवीन मेट्रो रेल्वे धोरण-२०१७ अंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) राबविण्यात येणारा हा पहिला मेट्रो प्रकल्प आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) पहिल्या १२ स्थानकांना प्रवासी सेवेसाठी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. आणखी पाच स्थानकांचा समावेश करून १७ स्थानकांवरून सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. उर्वरित सहा स्थानके सुरुवातीला बंद ठेवली जाणार आहेत.
आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली असून पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या तारखेबाबत पीएमआरडीएचे लक्ष आता निवडणूक यंत्रणेच्या मार्गदर्शनासह पीएमओच्या निर्णयाकडे लागले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप उद्घाटनाची तारीख मिळालेली नाही. त्यातच आता आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात उद्घाटनाचा कार्यक्रम घेता येईल की नाही, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. -डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

















