
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १३, यमुनानगर, सेक्टर २२ व साईनाथ नगर परिसरातील नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत तब्बल ८९० नागरिकांनी स्मार्ट कार्डचा लाभ घेतला.
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले व माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले-मराठे यांच्या सौजन्याने मनसे जनसंपर्क कार्यालय, साईनाथ नगर येथे ही मोहीम सलग ६ ते ७ दिवस राबविण्यात आली. एसटी महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी अल्पदरात स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी होणारी धावपळ कमी व्हावी आणि त्यांच्या परिसरातच ही सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या सुविधेचा लाभ घेतला.
दरम्यान, नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता लवकरच पुन्हा एकदा NCMC स्मार्ट कार्ड मोहीम राबविण्यात येईल, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.














