
सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याचा मला आनंद आहे-महापौर रवि लांडगे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी आणि पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी ने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, नगरसेवक विकास साने, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ,रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष डॉ. योगेश गाडेकर,सचिव डॉ अमित त्रिपाठी, मा.अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे,रो.संतोष मोरे,रो.दीपक सोनवणे, प्रशासकीय संचालक केशव काळदाते, खजिनदार सुनील पाटील पाटील,रो.अविनाश तळवले, रो.स्वप्नील भालेराव, तसेच पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाचे नूतन अध्यक्ष रोहित खर्गे, महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. दीपक सोनवणे यांनी केले. पत्रकार हे समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून, विविध घटना आणि नागरिकांच्या समस्या समाजासमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करीत असतात, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांसाठी काहीतरी मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ज्ञानेश्वर विधाटे यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही रोटरीची परंपरा असून,पत्रकार बांधवांसाठी यापुढेही आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
माजी अध्यक्ष संतोष मोरे म्हणाले की, रोटरी क्लबचे सदस्य स्वतःच्या खर्चातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. समाजाच्या हितासाठी आणि गरजू घटकांसाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यास रोटरी क्लब सदैव तत्पर राहील.
पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाचे नूतन अध्यक्ष रोहित खर्गे यांनी पत्रकार संघ आणि पत्रकार महासंघ हे पत्रकारांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करणारे घटक असल्याचे सांगितले. मुख्य आधारस्तंभ अरुण उर्फ नाना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी दोन्ही संघटना एकजुटीने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगरसेवक विकास साने म्हणाले पत्रकार कायमच सत्यासाठी लढत असतात. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार हे विश्वासाचे माध्यम वाटते. अशा महत्त्वाच्या सामाजिक घटकाच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लबने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. पत्रकारांना हेल्मेटबरोबरच विमा संरक्षण मिळावे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाच्या महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे, महासंघांचे कार्याध्यक्ष दादाराव आढाव, पिंपरी चिंचवड पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, अशोक कोकणे, अविनाश कांबीकर, विवेक कुलकर्णी, गणेश मोरे, भीमराव बरकडे, संतोष जाधव, प्रवीण कांबळे, माधुरी कोराड, लीना माने, श्रद्धा कोतावडेकर, श्रद्धा प्रभुणे, शेहनाज कुरणे, श्रीधर जगताप, कालिंदर शेख, शफिक शेख,भीमराव तुरुकमारे, नागेश खजुर्गीकर, सीताराम मोरे, देवा भालके,दिलीप देहाडे, प्रदीप सपकाळ, राम बनसोडे, यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दादाराव आढाव यांनी केले तर आभार प्रवीण शिर्के यांनी मानले.पत्रकारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थित पत्रकारांनी स्वागत केले.

















