
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाची बैठक संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्याने तहकूब करण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर प्रशासनासमोर थेट चर्चा करण्याची संधीच मिळाली नाही.
या बैठकीच्या सुरुवातीला प्रभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका रेखा ताई देवकर यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, त्यानंतर ‘ल’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील बैठकीला उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. संबंधित अधिकारीच अनुपस्थित असल्याने प्रभागातील विविध प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस निर्णय अथवा कार्यवाहीचे आश्वासन मिळू शकले नाही.
बैठकीत प्रभागातील कचरा व्यवस्थापन, रखडलेली ड्रेनेजची कामे, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते दुरुस्ती तसेच प्रलंबित विकासकामे यासह नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक प्रश्नांवर चर्चा करून तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात येणार होती. मात्र, अधिकारी गैरहजर राहिल्याने हे सर्व प्रश्न पुन्हा एकदा प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल नगरसेवक योगेश भाऊ लांडगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आयोजित केलेल्या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिकारीच बैठकीला उपस्थित नसतील तर नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचणार कसे आणि त्यावर कार्यवाही होणार तरी कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“प्रभागातील प्रश्न सोडवायचे असतील तर सर्व संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित राहिलेच पाहिजेत!” असा स्पष्ट इशारा योगेश लांडगे यांनी प्रशासनाला दिला.
नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कचरा, ड्रेनेज, रस्त्यांवरील खड्डे आणि प्रलंबित विकासकामांबाबत प्रशासनाने केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
अधिकारी गैरहजर राहिल्याने बैठक तहकूब झाली असली, तरी नागरिकांच्या प्रश्नांवर आता प्रशासन काय कार्यवाही करते, याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

















