ताज्या घडामोडीपिंपरी

“आत्मविश्वासाने परीक्षेला आणि भावी आयुष्याला सामोरे जा!” – शोभा जोशी

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “आत्मविश्वासाने परीक्षेला आणि भावी आयुष्याला सामोरे जा!” असा संदेश ज्येष्ठ कवयित्री आणि सेवानिवृत्त शिक्षिका शोभा जोशी यांनी मंगळवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला. जय शिवराय प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल, माण, तालुका मुळशी येथे छत्रपती शिवाजी महाराज तसेच जय शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक कै. नानासाहेब बलकवडे यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शोभा जोशी यांनी हलक्याफुलक्या कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांचा ताण हलका केला. ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे, नारायण कुंभार, प्रदीप गांधलीकर यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले; तर ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे, रघुनाथ पाटील, कैलास भैरट, शामराव सरकाळे यांनी कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. जय शिवराय प्रतिष्ठानचे सचिव अविनाश बलकवडे, श्रीकांत बलकवडे, जिल्हा परिषद गट विभागप्रमुख शिवाजी भिलारे, एन.सी.एस.आय. कंपनीचे संचालक नीलेश काळवीट, अनुपमा नायडू, ओंकार वेदपाठक, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर दळवी, मुख्याध्यापक अंबादास रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वाहनचालक, कंत्राटी कामगार, मोलकरीण अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालक असलेल्या विद्यार्थ्यांची शाळा असे न्यू इंग्लिश स्कूलचे वैशिष्ट्य आहे.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय कुशलतेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दीपप्रज्वलन आणि सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, कै. नानासाहेब बलकवडे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थिनींच्या समूहाने गायलेल्या “हीच आमुची प्रार्थना…” या भक्तिगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संजय कम्प्युटर्सच्या संचालिका शुभांगी ठोंबरे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वितरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवर विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणातून उपस्थितांना त्यांच्या सभाधीटपणाचा प्रत्यय दिला; तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगतांमधून शाळा आणि शिक्षकांप्रति आपल्या हृद्य भावना व्यक्त करताना सर्वांना सद्गदित केले. शिक्षकांच्या वतीने मुख्याध्यापक अंबादास रोडे आणि लता सणस यांनी भावपूर्ण शब्दांत शुभेच्छा दिल्यात.
संभाजी थिटे, शीतल टकले, मंगल गायकवाड, प्रकाश रणदिवे, विजय भांगरे, भीमराव वाढवे, मनीषा मोरे, ज्योती गायकवाड, बाळासाहेब माने, अशोक ताटे या शिक्षकांनी संयोजनात सहकार्य केले. मिसबा खान, रेश्मा प्रजापती आणि संदीप केंद्रे या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button