
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडकरांनी तुडुंब प्रतिसाद दिला.
सध्याच्या डिजिटल युगात आपण काय ऐकतो, काय पाहतो, कोणते विचार आपल्यापर्यंत येतात आणि त्याचे आपण नेमके काय करतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
यापूर्वी माहिती मिळवण्यासाठी कष्ट पडत होते. आता तीच माहिती क्षणार्धात मोबाईलवर येते.यातील ‘अल्गोरिदम’मुळे दुसरी बाजू समोर येत नाही, ती समजून घेतली पाहिजे. थेटपणे लाईक, फॉरवर्ड केल्याचा काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे.मोबाईलमुळे घराघरात संवाद कमी झाला आहे. आपण मोबाईलमध्ये गुरफटून जात आहोत.
सोशल मीडियाच्या बाबतीत नवीन पिढी वेगवान आणि एनर्जी असणारी आहे. त्यांनी ‘रील’ऐवजी ‘रियालिटी’ काय आहे, याचा विचार केला पाहिजे.
अगोदर मी साधासुधा होतो. आताही तसाच आहे. आतून एक बाहेरून एक, असा माझा स्वभाव नाही. मी निस्वार्थीपणे सत्याचा स्वीकार करतो. जे काही करायचे, ते पारदर्शक पध्दतीने करायचे, अशी आई-वडिल आणि भावाची शिकवण आहे, त्याचे मी पालन करतो.
मला बदल्या आणि दबाव याची भीती वाटत नाही.
नियम हे केवळ बंधन नसून लोकहित साधण्यासाठीचे माध्यम आहे.
सगळेच अधिकारी काम करतात. कामाची पद्धत योग्य की अयोग्य हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी कधीही माझ्या आधीच्या अधिकाऱ्यांनी काय केले, हे पाहत नाही. तुलना करणे योग्य वाटत नाही. त्यापेक्षा आपण घेतलेल्या निर्णयांचा नागरिकांना अपेक्षित फायदा होतोय का, याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे.
हलाखीची परिस्थिती असू शकते. मात्र तशा परिस्थितीमुळे नैतिकतेशी तडजोड करणे योग्य ठरत नाही. तुम्ही गरीब आहात म्हणून चुकीचा मार्ग निवडणे हा पर्याय असू शकत नाही. तुमच्याकडे बौद्धिक प्रामाणिकपणा नसेल तर मिळणारे यश तात्पुरते असते आणि तेही चिरंतन टिकणारे नसते.
एखाद्या व्यक्तीला देवत्व देणे किंवा दानवत्व देणे खूप धोकादायक आहे. प्रत्येक जण माणूस आहे. तो चुकू शकतो.
“मी पब्लिक सर्व्हन्ट आहे. निवृत्तीनंतर काय करायचं, हे आत्ताच ठरवलेलं नाही आणि सर्वच गोष्टींचा आताच खुलासा करता येणार नाही. ‘सचिन तेंडूलकरपेक्षा माझा भाऊ खूप मोठा’. प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आणि पिंपरी पालिकेच्या प्रशासकीय सेवेत असताना कौतुकास्पद कामगिरी करणारे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे यांचा यावेळी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
मुलाखतीत बोलताना, तुकाराम मुंढे यांनी आपल्या बंधूंचे म्हणजेच अशोक मुंढे यांचं आयुष्यातील महत्वपूर्ण स्थान अधोरेखित केलं. सचिन तेंडुलकरच्या भावापेक्षा माझा भाऊ खूप मोठा आहे, असे म्हणत त्यांनी अशोक मुंढे यांच्या कार्याविषयी अभिमान व्यक्त केला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
पत्रकार शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ या पुस्तकातील मजकुराचे श्रीकांत चौगुले यांनी अभिवाचन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले.सानिका कांबळे हिने आभार मानले.

















