
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वच्छ, सुंदर आणि वसुंधरापूरक शहराच्या संकल्पनेला नागरिकांच्या सहभागाची जोड देत उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव परिसर आणि वीर सावरकर उद्यान येथे विशेष ‘प्लॅगाथॉन’ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, महापालिका कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेदरम्यान परिसरातील तब्बल ३०० ते ३५० किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वतः या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांसोबत परिसरातील कचरा संकलित केला. मोहिमेच्या प्रारंभी उपस्थितांना ‘माझी वसुंधरा’ची शपथ देण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे तसेच परिसराची स्वच्छता राखणे याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभागी होत स्वच्छतेचा संदेश दिला.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’च्या अनुषंगाने उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. ओला, सुका, घातक आणि विशेष काळजीचा कचरा अशा चार प्रकारांत कचऱ्याचे विलगीकरण करून तो महापालिकेच्या घंटागाडीला द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, आरोग्य निरीक्षक राजू चटोले, आरोग्य मुकादम सुरेश भाऊसाहेब, संतोष धोत्रे, दत्ता भालेराव, आर्मी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका पारोमिता नंदी, उपमुख्याध्यापिका मेघा शिदोरे, शिक्षकवृंद, विद्यार्थी, महापालिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















