
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने पुणे महामेट्रो, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेट्रो फीडर रिक्षा सेवा’ सुरू करण्यात आली. पीसीएमसी मेट्रो स्टेशन येथे सोमवारी या सेवेचा अधिकृत उद्घाटन सोहळा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक तुषार हिंगे, पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अमित डोळस, शहर अभियंता मनोज सेठीया आदी मान्यवर उपस्थित होते.
मेट्रो प्रवाशांच्या लास्ट-माइल कनेक्टिव्हिटीची समस्या दूर करण्यासाठी ही सेवा शेअरिंग तसेच मीटर पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेट क्रमांक १ वरून घरकुल प्रकल्प, जाधववाडी, कुदळवाडी, चिखली गाव, अजमेरा कॉलनी, केएसबी चौक, मोरवाडी कोर्ट आणि शाहूनगर या मार्गांवर रिक्षा सेवा उपलब्ध असेल.
गेट क्रमांक २ वरून अंथिया सोसायटी, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, अंतरिक्ष कॉलनी, खराळवाडी, मोनिका अपार्टमेंट आणि डी. वाय. पाटील कॉलेज या भागांसाठी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. तर गेट क्रमांक ४ वरून पिंपरी गाव, चिंचवडगाव, तापकीर नगर, वाल्हेकरवाडी, निगडी, डीलक्स चौक, काळेवाडी ब्रिज, साई चौक आणि चाफेकर चौक या मार्गांवर रिक्षा धावणार आहेत.
प्रवाशांना भाडे नाकारल्यास कठोर कारवाई
प्रवाशांना विनाव्यत्यय सेवा मिळावी यासाठी ‘नो रिफ्युजल पॉलिसी’ लागू करण्यात आली आहे. मेट्रो स्टेशनवर उपस्थित रिक्षाचालकांनी कोणत्याही प्रवाशाला भाडे नाकारू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना सेवा नाकारणाऱ्या चालकांवर कायदेशीर तरतुदींनुसार तसेच संघटनेच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी या उपक्रमामुळे मेट्रो प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार असून रिक्षाचालकांना हक्काचा आणि सन्मानजनक रोजगार मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. स्मार्ट आणि नागरिककेंद्रित पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी या उपक्रमाला महापालिकेची पूर्ण साथ राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मेट्रो आणि रिक्षा सेवेतील समन्वयामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळण्यासोबतच नागरिकांना मेट्रो स्टेशनपासून त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी अधिक सुलभ आणि उपलब्ध पर्याय मिळणार आहे.
















