
22 ते 24 ऑगस्ट दरम्यान होणार विविध कार्यक्रम ; संयोजक नामदेव ढाके यांची माहिती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात वास्तव्यास असलेल्या खानदेशवासीयांसाठी संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सणाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अखंडितपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित तिसऱ्या ‘भव्य खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’ च्या तयारीनिमित्त शिवनगरी येथील तुळजाभवानी मंदिरात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. खानदेश सार्वजनिक कानबाई उत्सव मंडळातर्फे आगामी २२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा सोहळा अत्यंत थाटामाटात साजरा केला जाणार आहे.
या भव्य महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय सावकारे, आणि मंत्री जयकुमार रावल आदी दिग्गज मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवसीय उत्सवाचे सविस्तर वेळापत्रक
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ (सत्ता पूजन):
उत्साहाच्या शुभारंभानिमित्त सायंकाळी ५ वाजता तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड येथे ‘सप्ताह पूजन’ (गहू दळणे) हा पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पडेल.
रविवार, २३ ऑगस्ट २०२६ (आगमन व सांस्कृतिक कार्यक्रम):
दुपारी २ ते ७: तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी येथून शुभम गार्डन, वाल्हेकरवाडीपर्यंत कानबाई माता आगमन भव्य मिरवणूक काढली जाईल. या मिरवणुकीत शिरपूरची प्रसिद्ध ‘गोल्डन बँड’ आणि अमळनेरची ‘राधेकृष्णा बँड’ विशेष आकर्षण असणार आहे. महोत्सवात महिलांनी कलश घेऊन तर पुरुषांनी पारंपरिक वेषात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७ वाजता: शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी येथे देवीची स्थापना, कानबाई माता पूजन आणि उत्सव उद्घाटन सोहळा संपन्न होईल. याचवेळी मान्यवरांचा सत्कार व मनोगताचा कार्यक्रम होईल.
रात्री ८ वाजल्यापासून: भाविकांसाठी मातांचे दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होईल.
रात्री ८ ते १०: खानदेश फ्रेंड सर्कल ग्रुप (शिरपूर, धुळे, पुणे) यांचे कलाकार तसेच लोकप्रिय गायक सागर देशमुख, दिलीप बाशिंगे, कुणाल महाराज आणि दिनेश बाशिंगे यांच्या उपस्थितीत कानबाई मातेच्या गाण्यांचा भव्य संगीतमय कार्यक्रम होईल.
सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ (विसर्जन सोहळा):
सकाळी ८ वाजता: शुभम गार्डन ते जाधव घाट, रावेत या मार्गावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शिरपूरच्या ‘गोल्डेन बँड’च्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन मिरवणूक निघेल.
विविध समाज संघटनांचे सहकार्य
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी खान्देश मराठा मंडळ, मराठा पाटील समाज मंडळ, गुजर स्नेह वर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठान, खान्देश तिळवण तेली समाज मंडळ, लेवा पाटीदार समाज मंडळ, खानदेश माळी महासंघ, संतसेना महाराज खान्देश नाभिक मंडळ, भारतीय बहुजन विकास समिती, खानदेश अहिराणी कस्तुरी मंच, आहिरे मराठा मंडळ, वारी समाज मंडळ, सोनार समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, राजपूत समाज मंडळ, महाराणा मित्र मंडळ, कुंभार समाज मंडळ, बडगुजर समाज मंडळ, वंजारी समाज मंडळ, शिंपी समाज मंडळ, खानदेश लाड शाखीय वाणी समाज मंडळ, क्षत्रिय माळी समाज मंडळ, कासार समाज मंडळ, लोहार समाज मंडळ, अखिल टोकरे कोळी समाज मंडळ, सुतार समाज मंडळ आणि कानबाई सेवा फाउंडेशन (खानदेश) यांसह शहरातील सर्व खानदेश समाजबांधव व भगिनी सह आयोजक म्हणून सक्रिय सहभाग घेत आहेत.
“पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या खानदेशवासीयांना आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा एकाच छताखाली अनुभवता यावी, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे. सर्व समाजबांधव अत्यंत उत्साहाने तयारी करत असून, बाप्पा आणि देवीच्या कृपेने हा महोत्सव अतिशय भव्यदिव्य पार पडेल आणि याद्वारे संपूर्ण खानदेश परिवार एकत्र येऊन एकोपा व आनंदाचा संदेश देईल,” असा विश्वास संयोजन समितीचे प्रमुख नामदेव ढाके यांनी व्यक्त केला आहे.
















