
‘पिंपरी-चिंचवड हे राजकीय प्रयोगांचे मैदान नाही’; पुराव्यांशिवाय महेश लांडगेंवर आरोप सहन करणार नाही, भाजप मुख्य प्रवक्ते राजू दुर्गेंचा इशारा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेचे राजकारण करण्याऐवजी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करणे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी भूमिका भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे मुख्य प्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजू अनंत दुर्गे यांनी मांडली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक भाजप नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर केलेल्या आरोपांवर दुर्गे यांनी तीव्र आक्षेप घेतला. “दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी करणे हा लोकशाहीतील प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, पुराव्यांशिवाय भाजपचे स्थानिक नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांचे वारंवार नाव घेऊन आरोप करणे आम्ही सहन करणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
महापालिकेकडून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, केवळ आर्थिक मदतीपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी वस्तुनिष्ठ चौकशी होणे आणि दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे दुर्गे यांनी स्पष्ट केले.
‘पुरावे द्या, अन्यथा राजकीय आरोप थांबवा’
आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना दुर्गे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये वारंवार येऊन स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप करण्यापेक्षा ठोस पुरावे आणि अधिकृत कागदपत्रांसह भूमिका मांडावी. केवळ राजकीय वक्तव्यांच्या माध्यमातून एखाद्या लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.
“महेश लांडगे यांचे नाव घेऊन आरोप करण्यापूर्वी दुर्घटनेशी त्यांचा नेमका संबंध काय, याचे पुरावे द्यावेत. केवळ राजकीय आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये,” असे दुर्गे यांनी सुनावले.
‘पिंपरी-चिंचवड राजकीय प्रयोगांचे मैदान नाही’
पिंपरी-चिंचवड शहर हे कोणत्याही एका व्यक्तीच्या राजकीय प्रयोगांचे मैदान नसून, शहरातील प्रश्नांवर निर्णय घेण्याचा अधिकार येथील जनतेचा आहे, असेही दुर्गे यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला सलग दोनदा सत्ता दिली असून, जनतेने दिलेल्या जनादेशाचा सर्वांनी आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर असून, त्यावर राजकीय श्रेयवाद करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. आरोग्याशी निगडित प्रश्नांवर राजकीय श्रेयवाद करण्यापेक्षा विधायक चर्चा करून नागरिकांना सुरक्षित आणि सक्षम व्यवस्था देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मृतांच्या दुःखावर राजकारण नको’
“मोशी दुर्घटनेतील मृतांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करणे, दोषींवर कारवाई करणे आणि भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे होय. राजकारण करायचे असेल तर विकासाच्या मुद्द्यांवर करा; मात्र मृतांच्या दुःखावर राजकारण करू नका,” असा थेट संदेश दुर्गे यांनी रोहित पवारांना दिला.
शहराच्या स्थापनेपासून कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर आजपर्यंत कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणीही दुर्गे यांनी केली.
मोशी दुर्घटनेच्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, दुर्गे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.
















