पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या कै सार्थक हर्षवर्धन कांबळे याचा शाळेमध्ये अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या आई किंवा वडिलांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवनेते सुरज बाबर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या माध्यमिक विद्यालय केशवनगर विद्यालयातील इयत्ता आठवीतील विद्यार्थी कै . सार्थक हर्षवर्धन कांबळे यांचा 16 फेब्रुवारी 2024 रोजी शाळा सुरू असताना विद्यालयातील जिन्याच्या दुसऱ्याच मजल्यावरील रेलिंग वरून घसरून तळमजरावर खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे , माननीय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेब यांनी पाच लाख रुपये महापालिकेमार्फत मदत करण्याची घोषणा केली परंतु ही घोषणा त्या विद्यार्थ्यांच्या घरातील पालकांची झालेली हानी भरून निघणार नाही यासाठी आर्थिक मदतीच्या पलीकडे जाऊन महानगरपालिकेने विचार करायला हवा यासाठी महानगरपालिकेने विद्यार्थ्याच्या आई किंवा वडिलांना महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी दिली पाहिजे व ही या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून माननीय आयुक्त शेखर सिंह साहेब आपली नैतिक जबाबदारी आहे .आपण जर आज पाहिले तर या पालकांचा आधार गेलेला आहे , यामुळे भविष्यात त्यांच्या वृद्धपकाळी त्यांना आर्थिक प्रश्नातून जावे लागेल यामुळे यांचा आताच आपण विचार करायला हवा.
वास्तविक पाहता यापूर्वी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सर्व सरकारी इमारतींचे सेफ्टी ऑडिट करण्यास सांगितले होते परंतु हे सेफ्टी ऑडिट महानगरपालिकेने केलेले दिसत नाही, आज आपण हा प्रसंग पाहत आहोत या घटनेला सर्वस्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार आहे यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा जर सेफ्टी ऑडिट केले असते , अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला असता हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे तसेच अशा घटना पुढे होऊ नयेत याची काळजी म्हणून आपण तात्काळ सेफ्टी ऑडिट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी शाळा व कार्यालय यांचे करावे .तरी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकास तात्काळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत रुजू करून घ्यावे , असे ही निवेदनात म्हटले आहे.

