
₹२५ हजार सानुग्रह अनुदान व ८.३३% बोनसचा निर्णय; जुनी पेन्शन, सेवा प्रवेश नियमावलीसह २८ मागण्यांवर सकारात्मक चर्चा
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी दिलेल्या संप नोटीसच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सकाळी १०.३० वाजता झालेल्या या बैठकीस कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे, संघटनेचे पदाधिकारी तसेच महानगरपालिकेतील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली.
या बैठकीमध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सानुग्रह अनुदान व बोनसबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेतील सर्व पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान तसेच ८.३३ टक्के बोनस पुढील पाच वर्षांसाठी देण्याबाबतचा करार आठ दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले.
सेवा प्रवेश नियमावली महिनाभरात शासनाकडे
महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीचा विषयही बैठकीत चर्चेत आला. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही नियमावली अंतिम करण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः पुढाकार घेतला. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त विकांत बगाडे यांच्या माध्यमातून कर्मचारी महासंघाशी चर्चा करून सेवा प्रवेश नियमावली अंतिम करून एका महिन्याच्या आत शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्याचे निश्चित करण्यात आले.
जुनी पेन्शन योजनेबाबत समिती स्थापन होणार
महापालिका कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. या मागणीवर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून, यासंदर्भात स्वतंत्र समिती गठित करून एका महिन्याच्या आत पुढील निर्णय घेण्याचे ठरले. त्यामुळे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मोफत घरांचा मार्ग मोकळा
आरोग्य विभागात सलग २५ वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शासन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना मोफत घरे उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे.
याशिवाय कर्मचारी महासंघाने मांडलेल्या इतर २८ विविध प्रलंबित मागण्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. या मागण्यांबाबत पुढील काही दिवसांत आवश्यक कार्यवाही करण्याची सकारात्मक भूमिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.
संप नोटीसबाबत सभावृत्तांतानंतर निर्णय
दरम्यान, प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे कर्मचारी महासंघाने स्वागत केले आहे. बैठकीत झालेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली आहे.
मात्र, ३१ जुलै रोजी देण्यात आलेल्या संप नोटीसबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. बैठकीचा अधिकृत सभावृत्तांत कर्मचारी महासंघास प्राप्त झाल्यानंतर महासंघ सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार असून, त्यानंतर संप नोटीसबाबत पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी आणि महासंघाच्या पुढील भूमिकेकडे महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
















