
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी चौक ते घरकुल परिसरातील स्पाईन रोड आणि सर्व्हिस रोडवरील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, संशयित अतिक्रमण आणि झाडतोडीच्या तक्रारींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात कुदळवाडी चौक ते कृष्णानगर संविधान चौक या मार्गावरील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉल्फिन विस्टा सोसायटी, स्टार बाजार, मॅट्रिक्स क्लासेस, मौर्य फोर हॉटेल, सूर्य हॉस्पिटल तसेच कृष्णानगर पोलीस लाईनसमोरील बस पार्किंगमुळे वाहतुकीवर मोठा ताण येत असून स्थानिक नागरिकांना रोज कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे जाधव यांनी नमूद केले आहे.
कुदळवाडी ब्रिजपासून घरकुल चौकापर्यंत अवघे ३०० मीटर अंतर पार करण्यासाठी अनेकदा अर्धा ते पाऊण तास लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. यामुळे दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असून आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात सार्वजनिक फुटपाथवर उभारण्यात आलेल्या संशयित अनधिकृत जिन्याची चौकशी करून त्याची कायदेशीरता तपासावी, तसेच परिसरातील झाडांची परवानगीशिवाय छाटणी किंवा तोड झाली असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चिखली वाहतूक विभाग आणि चिखली पोलीस ठाण्यालाही स्वतंत्र निवेदने देण्यात आली असून सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटवणे, ‘नो पार्किंग’ फलक लावणे आणि वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत मारुती गणपत जाधव म्हणाले, “कुदळवाडी ते घरकुल परिसरातील वाहतूक कोंडी ही केवळ गैरसोयीची बाब नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण आणि इतर समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.”
















