
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कला केंद्र समितीच्या वतीने उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. बारावीची विद्यार्थिनी आसावरी बदडे हिने सादर केलेल्या भावपूर्ण गायनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली, तर विद्यार्थिनींच्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या मातृपूजन उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या भावनिक क्षणांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाला योग्य दिशा मिळते, ही भावना विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या या सन्मानामुळे शिक्षकवृंदही भारावून गेले.
समारोपप्रसंगी प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी आयुष्यभर गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता आणि संस्कार जपावेत, असे आवाहन केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, डॉ. भूपाली शहा तसेच संचालिका डॉ. तेजल शहा यांनी शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे व विद्यार्थ्यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक कला केंद्र समितीच्या प्रमुख प्रा. सुप्रिया चेडे यांनी केले.
















