
सर्वपक्षीय बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर; तक्रार निवारण दिन, नवीन सब-स्टेशन आणि विशेष हेल्पलाइनसह चार महत्त्वाचे निर्णय
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आमदार अमित गोरखे यांनी आक्रमक भूमिका घेत महावितरण प्रशासनाला एक महिन्याच्या आत ठोस उपाययोजना करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. सावरकर भवन, निगडी प्राधिकरण येथे आयोजित उच्चस्तरीय सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांबाबत जाब विचारत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
शाहूनगर, संभाजीनगर, काळभोरनगर, निगडी प्राधिकरण, मोहननगर, मोरवाडी, विद्यानगर आणि आकुर्डी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सलग दोन-दोन दिवस वीज नसणे, तांत्रिक बिघाडानंतर दुरुस्तीला होणारा विलंब आणि वाढत्या तक्रारींमुळे नागरिकांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर आमदार गोरखे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत सुनावत नागरिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीने राबविण्याचे आदेश दिले.
बैठकीत प्रत्येक बुधवारी ‘तक्रार निवारण दिन’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच २८ ऑगस्टपर्यंत सर्व प्रलंबित तक्रारींचा विशेष आढावा घेऊन त्यांचे प्राधान्याने निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय वाढत्या वीज मागणीचा विचार करून आवश्यक त्या ठिकाणी कर्मचारी संख्या वाढविणे, भविष्यातील गरज लक्षात घेऊन नवीन सब-स्टेशन उभारणीची प्रक्रिया गतीने राबविणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र विशेष तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, “वीज हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. महावितरणने एका महिन्याच्या आत परिस्थितीत सुधारणा करावी. अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन उभारले जाईल.”
नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत तक्रार किंवा अडचण असल्यास महावितरणच्या ७८७५७२४०९१ आणि ७८७५७२४५४९ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बैठकीतील निर्णयांनंतर आगामी महिनाभरात वीज समस्यांवर प्रभावी उपाययोजना होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
















