
किवळे -रावेत- डांगे चौक-काळेवाडी-जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या निगडी भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाला खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याने गती मिळाली आहे. त्याचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच मान्यता मिळेल. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असून लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
निगडी ते चाकण मेट्रो आराखड्याचे सादरीकरण सोमवारी झाले. या बैठकीतमुकाई चौक किवळे -रावेत- डांगे चौक-काळेवाडी-जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी असा मेट्रो मार्ग तयार करावा. त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करण्याची सूचना खासदार बारणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना केली. रावेत, ताथवडे, थेरगाव, जगताप डेअरीपासून चतु:श्रृंगीला जोडण्याचा मेट्रो मार्ग करावा. त्याला गती द्यावी, असे खासदार बारणे म्हणाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरी क्षेत्रांपैकी एक आहेत. जलद शहरीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली. सध्या या भागात मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. ज्यामुळे नागरिकांना सुलभ सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध होत आहे. निगडी ते चाकण मेट्रो मार्गाचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचे सादरीकरण मेट्रोने केले आहे. या मार्गामुळे चाकण, भोसरी एमआयडीसी पट्ट्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे उद्योगाला चालना मिळणार आहे. या आराखड्याला महापालिका सभेची मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेसाठी लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
निगडी ते भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो मार्गाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. हे पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. पिंपरी-चिंचवडमधील वेगाने वाढणारी लोकसंख्या, वाढत्या वाहतुक कोंडीमुळे आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेता मुकाई चौक किवळे-रावेत-डांगे चौक-काळेवाडी-जगताप डेअरी व सध्याच्या चतु:श्रृंगी मेट्रो स्टेशनपर्यंत विस्तार करण्याची आवश्यक आहे. हा संपूर्ण मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी उद्देशांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे मेट्रो सेवा आवश्यक आहे. या विस्तारामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला एक नवीन चालना मिळेल. त्यामुळे मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासंबधी आवश्यक असणारी प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.
















