
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – २७ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि. २७ व दि. २८ जुलै २०२६ या दिवशी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले आहे. दि. २७ जुलै रोजी सायं. ७.०० वाजता नृत्य गाथा (भक्ति, शक्ति, संस्कृती) हा कार्यक्रम नुपूर नृत्यालयामार्फत डॉ. सौ. सुमेधा गाडेकर आणि सहकलाकार सादर करतील, त्यानंतर उद्घाटन सोहळा संपन्न होईल. पंडित नयन घोष विख्यात तबला आणि सतार वादक यांना स्वरसागर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल, त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेती, पार्श्वगायिका, सावनी रवींद्र “सावनी सरी” हा हिंदी-मराठी चित्रपट गीतांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम सादर करतील.
दि. २८ जुलै रोजी सुवर्णा बाग यांच्या शिष्यांचा नृत्यांजलीचा कार्यक्रम सायं. ७.०० वाजता होईल, त्यानंतर आदिती रवींद्र कोंढरे भरतनाट्यम रचनाः देवी कौतुकम हा कार्यक्रम सादर करतील. महोत्सवाची सांगता विख्यात गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या अभंगरंग आणि शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाने होईल. हा कार्यक्रम विशेषतः आषाढी एकादशी आणि वारीच्या सांगता निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे आयोजन आणि संयोजन श्री प्रवीण तुपे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आणि “क्वालिटी वर्ल्ड डेव्हलपर्स” यांचा सहभाग आणि सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
















