
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरासाठी महत्त्वाच्या असलेल्या पवना धरणातून आज (24 जुलै) सकाळी 9 वाजल्यापासून नदीपात्रात 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण प्रकल्प प्रशासनाने दिली आहे. सध्या धरण 95 टक्के भरले असून पाणलोट क्षेत्र आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.
धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सुरुवातीला 800 क्युसेक विसर्ग करण्यात येणार असून, पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन हा विसर्ग टप्प्याटप्प्याने 5000 क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विसर्ग वाढविण्यापूर्वी आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत.
दरम्यान, सततच्या पावसामुळे पवना नदी, ओढे आणि नाल्यांतील पाणीपातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नदीकाठावरील नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांनी सतर्क राहावे, नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प, पवनानगर यांनी केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि तालुका, जिल्हा तसेच शहर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.















