
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे यांच्या पुढाकारातून पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांचे जनहितवादी कार्य, विकासाभिमुख नेतृत्व, निर्णयक्षमता आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योगदानाला उजाळा दिला. त्यांच्या विचारांचा वारसा समाजसेवेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
रक्तदान शिबिरात युवकांसह विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा. योगेशजी बहल, नगरसेवक सागर कोकणे, नगरसेवक जितू ननावरे, माजी नगरसेवक बबनराव गाढवे, कैलासभाऊ थोपटे,सतीशदादा दरेकर,युवक शहराध्यक्ष शेखर काटे,युवा नेते उमेश काटे, चंद्रकांत तापकीर, सुमित डोळस, काळूराम कवितके, शिवसेवा शंभो मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे जनसेवेचा वारसा जपत समाजासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.














