
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या वतीने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या, भविष्यातील गरजा आणि अतिवृष्टीच्या काळात उद्भवणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मतदारसंघातील अनेक भागांमध्ये जुन्या व जीर्ण झालेल्या भूमिगत केबलमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याऐवजी नवीन आणि उच्च क्षमतेच्या केबल टाकण्याबाबत महावितरणला सूचना करण्यात आल्या. तसेच, खराब अवस्थेतील फिडर पिलर बॉक्स तातडीने बदलून नवीन बॉक्स बसविण्याची मागणीही करण्यात आली.
भोसरी विधानसभा क्षेत्रात वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता, भविष्यातील वीजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन सबस्टेशन उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. त्यासाठी आवश्यक जागेच्या उपलब्धतेबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
दरम्यान, अतिवृष्टीच्या काळात पाणी साचल्याने वीजपुरवठा खंडित होणे, केबलमध्ये बिघाड होणे आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड आणि भोसरीचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने उपस्थित होते. भोसरी विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
“भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे ही आमची प्राथमिकता आहे. वारंवार होणारे वीज खंडित होणे, जुन्या भूमिगत केबल्स, खराब फिडर पिलर बॉक्स आणि अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महावितरण प्रशासनासोबत समन्वयाने काम सुरू आहे. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता नवीन सबस्टेशन उभारणीसाठीही पाठपुरावा केला जात आहे. नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याची सूचना प्रशासनाला केलेली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड,














