
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रावेत येथील इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस) यांच्या वतीने आज, रविवार (१९ जुलै २०२६) रोजी श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वैष्णव परंपरेतील हा प्रमुख धार्मिक सोहळा असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत.
रथयात्रेला दुपारी ३.३० वाजता श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथपूजनानंतर सुरुवात होईल. त्याआधी दुपारी ३.०० वाजता आरती व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ७.३० वाजता रथयात्रेचा समारोप होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
रथयात्रेदरम्यान हरिनाम संकीर्तन, भजन, नृत्य आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव भाविकांना घेता येणार आहे. आयोजकांनी नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान श्री जगन्नाथांचे दर्शन घेण्याचे तसेच रथयात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह सुमारे १५ हजार भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.












