
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ आश्रमाची तातडीने दुरुस्ती करून पिंपरी-चिंचवड महापालिकेने या संस्थेचे पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुसळधार पावसामुळे आश्रमाच्या इमारतीचे, शैक्षणिक साहित्याचे, अन्नधान्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले असून गुरुकुलातील शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले आहे. पारधी, भटक्या-विमुक्त, वंचित आणि उपेक्षित समाजातील मुलांना शिक्षण व निवारा देणाऱ्या या संस्थेला तातडीची मदत मिळणे आवश्यक असल्याचे भोईर यांनी नमूद केले आहे.
महापालिकेने आश्रमाची डागडुजी करून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच भविष्यात संस्थेच्या कार्याला कायमस्वरूपी प्रशासकीय पाठबळ द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.












