
बारावीत 97.6 टक्के गुण; नियमित अभ्यास, शिस्त आणि पालक-शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे घवघवीत यश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने NEET-UG 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने 720 पैकी 670 गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) 498 वी रँक पटकावली. नियमित अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि पालक-शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळाल्याचे अतुल्याने सांगितले.
अतुल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई बोर्डातून, तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण सीबीएसई बोर्डातून पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत तिने 97.6 टक्के गुण मिळवले. लहानपणापासूनच जीवशास्त्र विषयाची विशेष आवड असल्याने डॉक्टर होण्याचे ध्येय तिने निश्चित केले होते.
आपल्या यशामागील सूत्र सांगताना अतुल्या म्हणाली, “मी रोजचे वर्ग कधीच चुकवले नाहीत. त्या दिवशीचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण केला. शंका तातडीने शिक्षकांकडून दूर करून घेतल्या आणि कोणताही बॅकलॉग ठेवला नाही. जीवशास्त्रासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकाचा वारंवार अभ्यास केला, तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासाठी अधिकाधिक प्रश्नपत्रिका व सराव प्रश्न सोडवले. परीक्षेच्या काळात ताण होता; मात्र आई-वडील आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास कायम राहिला.”
भविष्यातील ध्येयाबाबत अतुल्या म्हणाली, “उत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन एमबीबीएस पूर्ण करायचे आहे. त्यानंतर आवडीच्या विषयात उच्च शिक्षण घेऊन देशातच राहून रुग्णसेवा करायची आहे.”
अतुल्याचे वडील बाळासाहेब डोंगरे म्हणाले, “डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने लहानपणापासून पाहिले होते. आम्ही तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी उभे राहिलो. ती जे ध्येय ठरवते, ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेते. तिच्या या यशाचा आम्हाला अभिमान आहे.”
आई शर्मिला डोंगरे म्हणाल्या, “अतुल्या अभ्यासात अत्यंत हुशार असून तिची चिकाटी आणि जिद्द हेच तिचे मोठे बळ आहे. तिने घेतलेल्या परिश्रमाचे आज सार्थक झाले असून तिच्या यशाचा आम्हाला मनापासून आनंद आहे.”तिची बहीण अमूल्या डोंगरे हिचे ही वेळोवेळी मार्गदर्शन तिला मिळाले असल्याचे अतुल्याने सांगितले.
अतुल्या ही पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल ची विद्यार्थीनी असून तिला संस्थापक संदीप काटे, नगरसेविका अनिता काटे शाळेचे शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे तिने आवर्जून सांगितले. NEET-UG 2026 मधील या उल्लेखनीय यशामुळे अतुल्या डोंगरेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.












