
वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची पूजा – मेघराज लोखंडे मित्र परिवाराचा सेवाभावी उपक्रम
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत आहेत. या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी मेघराज दादा लोखंडे मित्र परिवार यांच्या वतीने, तन्मय जाधव यांच्या नियोजनातून, एक सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत हजारो वारकरी बांधवांना थंड पिण्याचे पाणी, भोजन, बिस्किटे, गोळ्या तसेच प्राथमिक उपचारासाठी आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या सेवेचा लाभ मोठ्या संख्येने वारकरी भाविकांनी घेतला.
यावेळी मेघराज दादा लोखंडे यांनी सांगितले की, “वारकरी म्हणजे चालता-बोलता विठ्ठल असून, त्यांची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाची पूजा करण्यासारखे आहे. समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे आणि भविष्यातही अशा सेवाभावी उपक्रमांमध्ये आम्ही सातत्याने सहभागी राहू.”
या उपक्रमात तन्मय जाधव,आदित्य रावल,सिद्धांत पाटील,निरंजन गायकवाड,रेयांश रणवडे व मित्र परिवारातील अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकरी बांधवांची मनापासून सेवा केली. उपस्थित वारकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
‘सेवेचा हा छोटासा प्रयत्न विठ्ठल चरणी अर्पण’ या भावनेतून पार पडलेला हा उपक्रम समाजात सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला.



