
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये भोजन, आरोग्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती उद्भवल्यानंतर आज दुपारी १२ वाजेपर्यंत विविध बाधित भागांतील १८८० व्यक्तींचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पूरबाधितांसाठी महापालिकेने विविध ठिकाणी निवारा केंद्रे तयार केली असून तेथे भोजन, आरोग्यासह आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेचा आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तीय हानी होऊ नये, यासाठी महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले आहे.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनीह शहरातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेताना पावसाचा जोर वाढत असताना शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची धोक्याची पातळी लक्षात घेऊन त्या भागातील नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे पूर्वसूचना देऊन पूरबाधितांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. कोणत्याही परिस्थितीत अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
पूर निवारा केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधेसह पथके नेमली आहेत. त्यांनी पूरबाधितांची आरोग्य तपासणी करून आवश्यक प्राथमिक उपचार करावेत. भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सोयीसुविधांची कमतरता राहणार नाही, याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती लक्षात आल्यास महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-६७३३११११ / ०२०-२८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले.
*विशेष लक्ष असणारे भाग*
पिंपरी चिंचवड शहरातील नदीपात्रापासून जवळ असणाऱ्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भाटनगर परिसर, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे निलख पंचशील नगर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रामनगर, बोपखेल, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील संजय गांधी नगर, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे गुरव, लक्ष्मीनगर या भागांत पुराचे पाणी शिरण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय निवारा केंद्रांत असणाऱ्या पूरबाधितांची संख्या
(आकडेवारी ६ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंतची)
‘अ’ क्षेत्रीय कार्यालय – ३०० नागरिक
‘ब’ क्षेत्रीय कार्यालय – ६३० नागरिक
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय – ९५० नागरिक
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय – २१० नागरिक
…….



