
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य कन्सल्टंटच्या कामकाजावर नगरसेवक व शहर सुधारणा समिती सदस्य विनोद नढे यांनी गंभीर आक्षेप घेत प्रशासनावर निशाणा साधला आहे. शहरातील विविध विकासकामांमध्ये सल्लागार संस्थेच्या भूमिकेची, कामांच्या गुणवत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
विनोद नढे यांनी दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे की, महापालिकेच्या विविध विभागांमध्ये स्थापत्य कन्सल्टंटच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. कामांची पाहणी, तांत्रिक तपासणी, अंदाजपत्रक तयार करणे तसेच कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असताना अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही. कामांची गुणवत्ता, खर्च आणि जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,” अशी मागणी नढे यांनी केली आहे.
तसेच संबंधित संस्थेकडून सादर करण्यात आलेली बिले, कामांचे अहवाल, तांत्रिक कागदपत्रे आणि मंजुरी प्रक्रियेची तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“करदात्या नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये हलगर्जीपणा किंवा आर्थिक गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी भूमिका नढे यांनी मांडली आहे.
तसेच संबंधित संस्थेकडून महापालिकेच्या नियमांनुसार काम झाले आहे का? कर्मचाऱ्यांच्या वेतन, बँक स्टेटमेंट, पीएफ आणि ईएसआयसीसह आवश्यक बाबींची तपासणी प्रशासनाने करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
स्थापत्य कन्सल्टंटच्या कामांमुळे महापालिकेच्या आर्थिक हिताला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत, प्रशासनाने तातडीने चौकशी करावी असे निवेदनात म्हटले आहे.



