
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी भाविकांसाठी विविध प्रकारच्या मूलभूत व आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये तसेच सर्व सुविधा सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून व्यापक तयारी करण्यात येत असते.
या पार्श्वभूमीवर आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन, मुक्काम व्यवस्था तसेच विविध विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मंगळवार, दि. १६ जून २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता महापालिका मुख्य प्रशासकीय भवन, पिंपरी येथील तिसऱ्या मजल्यावरील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या बैठकीमध्ये पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, तात्पुरती शौचालये, प्रकाश व्यवस्था, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन सेवा, अन्न सुरक्षा, मुक्काम स्थळांवरील सुविधा तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. यासोबतच पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीस महापालिकेचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त,अतिरिक्त आयुक्त,संबंधित विभागप्रमुख, देहू व आळंदी संस्थानांचे पदाधिकारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महापालिका संचलित संतपीठाचे पदाधिकारी तसेच विविध संबंधित विभागांचे, संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.



