
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाढलेल्या अपघातांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाची दखल; खड्डे बुजवण्याचे काम सुरू
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलत प्रभागातील धोकादायक खड्ड्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. शिवसाई लेन येथील फर्स्ट क्राय शोरूमसमोरील रस्ता खचल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या.
या समस्येची गंभीर दखल घेत संबंधित विभागाशी समन्वय साधून रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच प्रभागातील विविध काँक्रिट रस्त्यांवरील खचलेले भाग आणि धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येणार आहे.
या कामासाठी भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बाप्पू) काटे, नगरसेविका अनिता संदीप काटे तसेच नगरसेविका कुंदा संजय भिसे यांच्या पाठपुराव्यातून प्रयत्न करण्यात आले.
नागरिकांची सुरक्षितता आणि सुरळीत वाहतूक ही प्राथमिकता असून, रस्त्यांवरील समस्या प्रलंबित न ठेवता त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



