
दर महिन्याच्या चतुर्थीला वाढणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचा प्रश्न; अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेला सूचना
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडगावातील श्रीमंत महासिद्ध मोरया गोसावी मंदिर परिसरात दर महिन्याच्या चतुर्थीला उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत स्टॉलधारकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , चिंचवडगावातील श्रीमंत महासिद्ध मोरया गोसावी मंदिर हे राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून दर महिन्याच्या चतुर्थीला पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिराला राज्य शासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त असून आमदार शंकर जगताप यांच्या सहकार्याने विविध विकासकामेही सुरू आहेत.
मात्र, प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी मंदिरासमोरील रस्ते व आजूबाजूच्या परिसरात अनेक व्यापारी अनधिकृतपणे स्टॉल उभारून व्यवसाय करत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या स्टॉलमुळे भाविकांची गैरसोय होत असून वाहतुकीवरही परिणाम होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उभारण्यात आलेल्या अनधिकृत स्टॉलवरून दोन व्यावसायिकांमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या घटनेची चर्चा सोशल मीडियावरही झाली होती.
नगरसेवक भोईर यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या घटनांमुळे मंदिर परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच मंदिर परिसरातील शिस्त अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक चतुर्थीपूर्वी आणि चतुर्थीच्या दिवशी रस्त्यावर अनधिकृतपणे स्टॉल लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
तसेच, भविष्यात अशा प्रकारे अनधिकृत स्टॉल उभारण्याचे प्रकार रोखण्यासाठी अतिक्रमण विभागाने नियमित मोहीम राबवावी, अन्यथा स्टॉलधारकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
या पत्रामुळे आगामी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कितपत प्रभावी कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


