पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मोठ्या संख्येने महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या निषेधार्थ कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उद्या (दि. 5 जून) निगडी येथील तहसील कार्यालयासमोर ‘रुसवा आंदोलन’ करण्यात येणार आहे.
महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शासनाने लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही अनेक पात्र महिलांना लाभ मिळालेला नाही. तसेच राज्यातील सुमारे 2 कोटी 47 लाख लाभार्थ्यांपैकी केवळ 1 कोटी 70 लाख महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असल्याचे दिसून येत असून, 80 लाखांहून अधिक महिलांना विविध कारणांवरून अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या निर्णयामुळे कष्टकरी, कामगार, विधवा, परित्यक्ता आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांवर अन्याय होत असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या महिलांची पुन्हा केवायसी (KYC) करून त्यांना योजनेचा लाभ द्यावा, तसेच वंचित महिलांना तातडीने न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
हे आंदोलन उद्या सकाळी 10.30 वाजता निगडी येथील तहसील कार्यालयासमोर होणार असून, मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

