पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यापूर्वी स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि नाल्यांची तात्काळ साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन देत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली.
दरवर्षी महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि नाल्यांची साफसफाई केली जाते. मात्र, यावर्षी अद्याप प्रभावी कामे झाल्याचे दिसत नसल्याचा आरोप नाना काटे यांनी केला आहे. हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला असताना प्रशासनाने आवश्यक उपाययोजना न केल्यास शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
साफसफाई अभावी नाले व ड्रेनेज लाईनमध्ये कचरा साचून पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबते. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता वाढून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
यामुळे संभाव्य पावसाळी संकट टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने संबंधित विभागांना आदेश देऊन शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन आणि नाल्यांची युद्धपातळीवर साफसफाई करावी, अशी मागणी नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे.

