छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला २०२६ ची निगडीत सांगता
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘जगातील सांस्कृतिक पडझडीचा विचार करता मार्क्सवादाने सांस्कृतिक क्रांती घडवली, ही केवळ भ्रांती असून भारतात मार्क्सवाद कधीच रुजला नाही!’ असे ठाम प्रतिपादन प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला २०२६ च्या अंतिम सत्रात ते बोलत होते. याच कार्यक्रमाने तीन दिवसीय व्याख्यानमालेची सांगता झाली.
‘सांस्कृतिक क्रांती की भ्रांती?’ या विषयावर अंतिम पुष्प गुंफताना प्रा. देशपांडे यांनी मार्क्सवादाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भांचा ऊहापोह केला. ‘कार्ल मार्क्सने मांडलेला क्रांतीचा सिद्धांत हा केवळ आर्थिक मूल्यांवर आधारित असून त्याचा संस्कृतीशी थेट संबंध नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. युरोपातील एकेश्वरवादी परंपरा, धार्मिक संघर्ष आणि झेनोफोबिया या मानसिकतेतूनच सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य वैविध्य असून त्यामुळे येथे मार्क्सवादासारख्या एकरेषीय विचारसरणीला स्थान मिळाले नाही,’ असेही त्यांनी नमूद केले. तसेच, ‘परदेशी प्रभावातून मार्क्सवादी विचारसरणीने विविध घटकांना जोडण्याचे प्रयत्न केले असले, तरी समाजाने सजग राहून ते निष्प्रभ केले पाहिजेत!’ असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास उद्योजक किरण गारवे, मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सतीश सगदेव व चंद्रशेखर जोशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. समृद्धी पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीराम काळे यांनी आभार मानले. कायरा श्रीराम पोरे यांच्या नेतृत्वात ‘वंदे मातरम्’च्या सामुदायिक गायनाने छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला २०२६ ची उत्साहात सांगता करण्यात आली.

