पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शहर काँग्रेस कडून श्रमिक सेवा सन्मान उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील कामगारांना काँग्रेसचे सन्मान प्रमाणपत्र आणि उन्हाळ्यात उपयोगी असणारा एक नॅपकिन टॉवेल भेट स्वरूपात देऊन श्रमिकांचा सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना उपक्रमाचे आयोजक आणि शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले,
” जगाला शांतीचा सदाचाराचा सम्यक मार्ग देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५८८ व्या जयंती निमित्त, ६६ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस – महाराष्ट्र दिन आणि १०३ वा कामगार दिन हे सर्व औचित्य एकत्र येणे दिन विशेष असा योग आहे आणि या निमित्ताने ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी मानवतेचा आणि सेवेचा संदेश दिला त्याला अनुसरून आणि महाराष्ट्र दिनी हा महाराष्ट्र घडवणाऱ्या श्रमिकांच्या सन्मानार्थ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा श्रमिक सेवा सन्मान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे याद्वारे काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ हा संदेश देण्यासाठी आणि सध्याच्या शासन व्यवस्थेत कायम उपेक्षित आणि अन्यायाच्या छायेत व्यथित असलेल्या श्रमिकांना ते करत असलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यासाठी त्यांना आनंदाचे काही क्षण देण्यासाठी, राहुलजी गांधी यांच्या कार्यातून व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेत उपेक्षितांचे हितरक्षण या अनुषंगाने हा उपक्रम आयोजित केला आहे” असे बनसोडे यांनी सांगितले.
या उपक्रमा दरम्यान अग्निशामक कर्मचारी, एसटी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी आणि घरेलू काम करणाऱ्या कामगारांचा समावेश करण्यात आला एकूण 50 कामगारांना काँग्रेसचे प्रमाणपत्र आणि नॅपकिन देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक मोरे, पिंपरी चिंचवड काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, युवक काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे माजी अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नासिर चौधरी, शहर काँग्रेसचे सरचिटणीस हरेश डोळस आदी पदाधिकारी उपस्थित आणि सहभागी होते.

