पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय कामगारदिन, महाराष्ट्र राज्य स्थापनादिन आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने चौतिसावी श्रम – उद्योग परिषद आणि उपेक्षित कष्टकरी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आज (गुरुवार, दिनांक ३० एप्रिल) ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे दुपारी ठीक ०३:३० वाजता करण्यात आले आहे. मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते तसेच टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोर हे स्वागताध्यक्ष आहेत.
या सोहळ्यात उद्योजक भगवान पठारे (पद्मश्री नारायण सुर्वे कृषी – उद्योग जीवनगौरव सन्मान), श्रमश्री बाजीराव सातपुते यांच्या सहचारिणी नीता सातपुते (कृष्णाबाई नारायण सुर्वे मास्तरांची सावली सन्मान), प्राचार्य शंकर देवरे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस सन्मान), कामगार साहित्यिक अरुण गराडे (पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान), कवयित्री संगीता झिंजुरके (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार), डाॅ. स्वाती पाटील आणि नीलेश शेंबेकर यांना (पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार) प्रदान करून गौरविण्यात येईल. त्याचबरोबर मितेश डूळगज (शवविच्छेदक मजूर), प्रशांत बराटे (स्मशानभूमी सेवक), मुरलीधर फुंदे (सुरक्षारक्षक), कल्पना कदम (मोलकरीण), मनोजकुमार राम (पीठगिरणी मजूर) आणि प्रवीण बागूल (सफाई मजूर) या उपेक्षित कष्टकरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी आवर्जून या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समिती सचिव पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.

